Raj-Uddhav Meet : २ महिन्यात तिसऱ्यांदा भेटले राज अन् उद्धव; भावांमध्ये गप्पा, वहिनी रश्मी ठाकरे मनमोकळ्या हसल्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj-Uddhav Meet : २ महिन्यात तिसऱ्यांदा भेटले राज अन् उद्धव; भावांमध्ये गप्पा, वहिनी रश्मी ठाकरे मनमोकळ्या हसल्या

Raj-Uddhav Meet : २ महिन्यात तिसऱ्यांदा भेटले राज अन् उद्धव; भावांमध्ये गप्पा, वहिनी रश्मी ठाकरे मनमोकळ्या हसल्या

Published Feb 24, 2025 04:44 PM IST

Uddhav-Raj Thackeray Meet : मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी दोघे भाऊ एकमेकांशी बोलत असल्याचे तसेच मनमोकळे हसत असल्याचे फोटोंवरून दिसत आहे.

राज, उद्धव व रश्मी ठाकरे मनमोकळ्य गप्पा मारताना
राज, उद्धव व रश्मी ठाकरे मनमोकळ्य गप्पा मारताना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत एका लग्न समारंभात भेट घेतल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघे राजकीय मतभेद मिटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीयदृष्ट्या दुरावलेले हे दोन्ही भाऊ रविवारी सायंकाळी अंधेरी परिसरात सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात एकत्र दिसले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. दोघं एकमेकांशी बोलताना दिसले आणि रश्मी ठाकरे राज ठाकरेंसोबत हसताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. या भेटीनंतर  राज्यात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आगामी महापालिका निवडणुका, विशेषत: आर्थिकदृष्ट्या संपन्न बृहन्मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता मनसे आणि शिवसेना यांच्यातील मतभेद दूर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

ठाकरे बंधूंची २ महिन्यात तिसऱ्यांदा भेट -

गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा या भावांची जाहीर भेट झाल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये (तत्कालीन एकसंध) शिवसेना सोडली आणि पुढच्याच वर्षी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेला २० जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. इतकेच नाही तर राज ठाकरे यांचा पूत्र अमित ठाकरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

उद्धव व ठाकरे यांच्यातील  भेट यासाठी महत्त्वाची आहे, कारण गेल्या दोन दशकांपासून दोन्ही भाऊ एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत आणि एकमेकांवर राजकीय हल्ला करण्यात कोणीही कोणतीही कसर सोडलेली नाही, परंतु नुकतेच दोन्ही भावांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत, ज्यात दोघेही मोकळेपणाने बोलताना आणि हसताना दिसत आहेत.

यापूर्वी १५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात ठाकरे बंधू दिसले होते. त्यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी दादरच्या राजे शिवाजी शाळेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नाला आणि आता २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अंधेरी येथील महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पा तर केल्याच पण हसत-खेळत विनोदही केला. ठाकरे बंधूंच्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा झालेल्या भेटीमुळे दोन्ही पक्षांमधील दोन दशकांपासूनचे शत्रुत्व आणि कलह संपुष्टात येण्याची चर्चा रंगली आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या