मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ShivSena-Vanchit Alliance : मोठी बातमी! शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची घोषणा
vanchit bahujan aaghadi and shivsena alliance
vanchit bahujan aaghadi and shivsena alliance (HT)

ShivSena-Vanchit Alliance : मोठी बातमी! शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची घोषणा

23 January 2023, 22:33 ISTAtik Sikandar Shaikh

Sena-Vanchit Alliance : प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे.

vanchit bahujan aaghadi and shivsena alliance : आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळं आता शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर ठाकरे गटासोबत आंबेडकरांनी युती केल्यामुळं उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू होती. परंतु त्याची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यामुळं आता या युतीमुळं शिंदे गट आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा हे एकमेकांचे स्नेही होते. त्यांनी त्यावेळेला समाजातील वाईट रुढी आणि परंपरेविरोधात प्रहार केला. परंतु आता राजकारणातील वाईट रुढी आणि परंपरांना मोडण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर घराण्यातील आम्ही वारसदार एकत्र येत आहोत. सध्या जनतेला भ्रमात ठेवून देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळं आता लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र येत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. सध्या राज्यात आणि देशात जे काही सुरू आहे, ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. मोदींच्या सभेत कशा पद्धतीनं लोकं आणली गेली, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं घाणेरडं राजकारण आणि राजकारणातील वैचारीक प्रदूषण संपवण्यासाठी आम्ही युती करण्याचा निर्णय घेतल्याचं ठाकरे म्हणाले.

युतीची घोषणा करताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्या उमेदवारांना जिंकवणं हे मतदारांच्या हातात आहे, ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातात नाही. परंतु उमेदवारी देताना लोकांचं सामाजिकीकरण होत नाही. महाराष्ट्राची सत्ता सध्या केवळ ३६९ कुटुंबियांच्या आणि काही भांडवलदारांच्या हातात आहे. नात्यागोत्यांचं राजकारण सातत्यानं वाढत असून गरिबांचं राजकारण कमी होत आहे. त्यामुळं आता राजकारणात नव्या गोष्टी मांडण्याची गरज असून त्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत येत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.