देशातील कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न आज सत्यात उतरलं. ज्या मंदिरासाठी गेल्या अनेक तपापासून संघर्ष केला, आंदोलने केली, पोलिसांचा लाठीचार्ज सहन केला ते भव्य मंदिर अयोध्येत साकार झाले असून मंदिरात रामलल्लाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरातील मंदिरात महाआरती, प्रसादाचे वाटप करण्यात आले. देशभर आज दिपोत्सव साजरा केला गेला. राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या जवळच्या राममंदिरात जाऊन महाआरती केली. त्यात उद्धव ठाकरेंनी कुटूंबासह नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतलं.
नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे पोहचले होते. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्तेही पंचवटी भागात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्याठिकाणी पूजा करून महाआरतीही केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील रूद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी आपल्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालत होते. त्यांनी आयुष्यभर ती परंपरा जपली. आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा दिसल्याने बाळासाहेबांची परंपरा उद्धव पुढे चालवणार का, पुढे घेऊन उद्धव ठाकरे पुढील प्रवास करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबाने प्रभू श्री रामांची आरती केली.
दरम्यान ठाण्यात राम प्रतिष्ठापणा सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. जे लोक रामाचे नाहीत ते काही कामाचे नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या