Uddhav Thackeray on Maharashtra Bandh : ‘महाराष्ट्रात महिलांवर सातत्यानं होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात उद्याचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हा विकृती विरुद्ध संस्कृती असा बंद आहे, तो कडकडीत होईल,’ असं शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावलं.
बदलापूरसह राज्यातील विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या, २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंद पुकारला आहे. ठाकरेंची शिवसेना या बंदचं नेतृत्व करत आहे. राज्यातील सर्व जनतेनं या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कालच केलं होतं. त्यानंतर बंद विरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काही लोक न्यायालयात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली.
राज्यातील महिलांना व पालकांना आपल्या मुलींची चिंता वाटतेय. कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत का ही चिंताही भेडसावतेय. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या जातील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'जात-पात, धर्म, भाषा, भेद बाजूला ठेवून सर्वांनी यात सहभागी व्हायला हवं. कारण हा सामाजिक प्रश्न आहे. ही विकृती घरापर्यंत येऊ नये म्हणून जागे व्हा. एकजुटीचं विराट दर्शन घडवा आणि दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारलाही आवाहन केलं. 'बंद दरम्यान हिंसाचार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. उद्याच्या बंदच्या आड सरकारनं पोलिसांना दादागिरी करायला लावू नये. बंदचा फज्जा उडवण्याचा विचार करू नका. नाहीतर दोन महिन्यांनंतर तुमचा फज्जा उडाल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'कायदा आमचं रक्षण करत नसेल तर त्यांना त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. दुकानदारांनाही कुटुंबं आहेत. त्यांचीही मुलं शाळेत जातात. प्रश्न केवळ मुलींचा नाही. महिलांवरही अत्याचार होत आहेत. त्यामुळं त्यांनीही दुकानं बंद ठेवली पाहिजेत. दुपारी दोन वाजेपर्यंत दुकान बंद ठेवायला काय हरकत नाही. स्वत:च्या आया-बहिणींपेक्षा त्यांना आपला व्यवसाय प्यारा असेल तर त्यांना कुणीही वाचवू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र बंदच्या विरोधात कोर्टात जाणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. त्यांना त्यांच्या माता-भगिनींची चिंता नसेल. नराधमांचे पाठीराखे कोण आहेत ते उद्याही स्पष्ट होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.