मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje Bhosale: कोण कुठला तो थर्ड क्लास भिकारडा सुधांशू त्रिवेदी; उदयनराजे कडाडले!

Udayanraje Bhosale: कोण कुठला तो थर्ड क्लास भिकारडा सुधांशू त्रिवेदी; उदयनराजे कडाडले!

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 21, 2022 11:16 AM IST

Udayanraje Bhosale on Sudhanshu Trivedi: राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या दोघांच्याही वक्तव्याचा समाचार खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला.

उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale on Sudhanshu Trivedi: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेद वक्तव्याचा समाचार खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे बोलणारे विकृत आहेत. विकृत लोकांना पक्षातून काढून टाकायला हवं. शरीराला गँगरीन झाल्यावर जसा शरीराचा भाग कापून टाकला जातो तसंच त्रिवेदी आणि कोश्यारी यांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे, अशा शब्दांत उदयनराजेंनी टीका केली.

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंनी म्हटलं की, शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी वाचन केलं नसावं. अनेकदा ते असे विधानं करतात. महाराजांबद्दल किंवा अनेक राष्ट्रीय हिरोंबद्दलही ते बोलले आहेत. ते राज्यपाल या पदावर आहेत. मोठं सन्मानाचं पद असून त्या पदावर राहून ते पद सांभाळता येत नसेल तर अशा लोकांना त्या पदावरून बाजूला करणं योग्य आहे.

सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरून उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. कठोर शब्दात सुनावताना उदयनराजेंनी म्हटलं की, तो कोण कुठला थर्ड क्लास भिकारडा सुधांशू त्रिवेदी? असे विकृत लोक शिवाजी महाराजांविरुद्ध बरळत असतात. दोघांनाही छत्रपती शिवरायांची माफी मागायला लावा आणि पदावरून, पक्षातून काढून टाका अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करेन. त्यांना काढून टाकलं नाही तर माझी पुढची वाटचाल काय असेल ते मी तेव्हा सांगेन, असंही उदयनराजे म्हणाले.

'त्या राज्यपालांना महाराष्ट्रात काय, कुठंही ठेवू नये. त्याला काही आठवत नाही, वय झालंय. काय बोलतोय कळत नाही, जाऊ द्या घरी. वृद्धाश्रम बघून टाका तिकडं,' असंही उदयनराजे म्हणाले.

भाजपने स्पष्टीकरण द्यावं - संभाजीराजे


संभाजीराजे छत्रपती यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्यावरून भाजपला सुनावले. केंद्रात सरकार त्यांचे, राज्यात सरकार त्यांचे. तुम्ही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. हा त्रिवेदी हा कसं बोलू शकतो. बरोबर असेल तर बरोबर म्हणून दाखवावं. चुकीचं असेल तर माफी मागायला लावावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

WhatsApp channel