शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय उद्या चार वाजता लागणार आहे. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देत म्हटले की, संविधानाच्या चौकटीत राहून न्याय केल्यास ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील. या प्रकरणात राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतात की, राज्याच्या हिताचा निर्णय घेतात, याचाही फैसला होणार आहे. उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या आदित्य यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेल्या भेटीवर कडाडून टीका करत म्हटले की, यामुळे न्यायाची अपेक्षा कशी ठेवायची. हा प्रकार न्यायमूर्तीच आरोपींच्या भेटीला जाण्यासारखं आहे.
घटनाबाह्य सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम सुरू आहे. राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला नेला जात आहे.जर हे सरकार टिकलं तर मुंबईतील मंत्रालयही गुजरातला नेलं जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणात उद्या येणाऱ्या निकालाबाबत शंका उपस्थित करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्या पद्धतीने या प्रकरणाची हाताळणी सुरू आहे; त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय, अशी चिन्ह दिसत आहेत. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत. आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातली लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवेल.
संबंधित बातम्या