पुण्यातून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता ड्रग्जची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत. शहरातील एफसी रोडवरील हॉटेलमधला ड्रग्जचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातूनच दोन तरुणी ड्रग्ज घेतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे नगर रस्त्यावरील फोनिक्स मॉलमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आज समोर आला आहे.
एका हॉटेलमध्ये काही तरुण शौचालयात बसून ड्रग्स घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता दोन तरुणी ड्रग्स घेत असल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसते की, दोन तरुणी मोबाईलच्या स्क्रीनवर अंमली पदार्थांची पावडर टाकून त्याचे सेवन करताना दिसत आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील एका मॉलमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितले जात आहे.
पुण्यातील एका पबमधील टॉयलेटमध्ये काही तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यात खळबळ माजली होती. बेकायदेशीरपणे पहाटेपर्यंत चालणारे पब्ज आणि बार, व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईचा धांगडधिंगा आणि पुणे शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा. यामुळे विद्येचे माहेरघर ही ओळख असलेले पुणे बदलत असल्याचे दिसत आहे.
तरुण ड्रग्ज घेत असलेला व्हिडिओ रविवारी समोर आल्यानंतर पुण्यात ड्रग्जच्या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापलं आहे. ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आलंय.ड्रग्ज प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीचा आयोजक अक्षय कामठेलाही रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.
एफसी रोड पबमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेले पब्ज आणि बारचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोर्शे कार प्रकरणानंतरही प्रशासनानं कोणताही धडा घेतला नसल्याचं या पब संस्कृतीवरून स्पष्ट झालंय. रात्री-अपरात्री बार आणि पब्ज सुरूच आहेत. इतकंच नव्हे तर तिथे अंमली पदार्थही सहज मिळत आहेत.
व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाकडून धडक कारवाई सुरु केली असून दोन बीट मार्शलचं निलंबन करण्यात आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या