मद्यधुंद कारचालकाने मेंदी आर्टिस्टला उडवलं; मुंबईत दोन घटनांत दोन महिला ठार-two women killed in road accidents in mumbai ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मद्यधुंद कारचालकाने मेंदी आर्टिस्टला उडवलं; मुंबईत दोन घटनांत दोन महिला ठार

मद्यधुंद कारचालकाने मेंदी आर्टिस्टला उडवलं; मुंबईत दोन घटनांत दोन महिला ठार

Sep 05, 2024 04:36 PM IST

मुंबई शहरात रस्ते अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

मद्यधुंद कारचालकाने मेंदी आर्टिस्टला उडवलं
मद्यधुंद कारचालकाने मेंदी आर्टिस्टला उडवलं

मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. मालाड परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने २६ वर्षीय तरुणीला मागून जोरदार धडक दिल्याने ती चाकाखाली चिरडून ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत घाटकोपर पूर्व भागात छेडा नगर जंक्शन येथे एका ८० वर्षीय वृद्धेला महिलेला क्रेनने चिरडले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाडमध्ये मेंदी आर्टिस्ट म्हणून काम करणारी शहाना इक्बाल काझी (वय २६) ही तरुणी आपलं काम संपवून रात्री दहाच्या सुमारास मालाड मेट्रो स्थानकावरून घरी परत चालली होती. तेवढ्यात लिंक रोडवरील ऑरिस बिल्डिंग कॉम्प्लेक्सजवळ फोर्ड एंडेव्हर कारने तिला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. परंतु दुखापतीमुळे भरपूर रक्तस्त्राव झाल्याने तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीच्या कारच्या खिडक्या आणि विंड शील्डची तोडफोड केली. आरोपीचे नाव अनुप सिन्हा (वय ४२) असे असून तो मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांंगितले. पोलिसांनी आरोपीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

चेंबूरमध्ये क्रेनच्या धडकेत दर्शनासाठी मंदिरात जाणारी वृद्ध महिला ठार

दुसरी घटना चेंबूरमधील छेडानगर कॉलनीत सकाळी सहा वाजता घडली. येथील मुरुगन मंदिरात साफसफाई करण्यासाठी जाणाऱ्या कमला जगन्नाथ मुदलियार (वय ८०) यांना मागून येणाऱ्या क्रेनने धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. तिथून जाणाऱ्यांनी पादचाऱ्यांनी पोलिसांना फोन करत वृद्ध महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. टिळकनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघातग्रस्त वाहनाची ओळख पटवली असून मानखुर्द येथे राहणारा शैलेंद्रकुमार सुरेंद्र शहा या क्रेन चालकाला अटक केली आहे. मृतक कमला मुदलियार या गेली दहा वर्ष चेंबूरमधील छेडानगर कॉलनीतील मुरुगन मंदिरात साफसफाईचे काम करत होत्या. बुधवारी सकाळी त्या साफसफाई करण्यासाठी मंदिरात न पोहचल्याने पुजाऱ्याने सकाळी नऊच्या सुमारास कुटुंबीयांना फोन करून विचारणा केली. त्यानंतर चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिस स्टेशन आणि रुग्णालयांच्या फेऱ्या मारल्यावर कमला मुदलियार यांच्या मृत्युची बातमी समजली.