Truck Accident On Mumbai Pune Highway : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कंटेनरने कारला जोरदार घडक दिली असून त्यात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य पाच महिला गंभीर झाल्या असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली नजीक हा अपघात झाला आहे. त्यामुळं महामार्गावर काही तास मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व महिला या मुंबईत राहणाऱ्या असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या अवजड वाहनाने खोपोलीजवळ एका भरधाव कारला धडक दिली. त्यानंतर अन्य पाच वाहनं एकमेकांना धडकली. त्यानंतर अपघातग्रस्त कंटनेर रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळला. या अपघातात मुंबईतील दादर येथे राहणाऱ्या बकुळ राऊत आणि तेजस्विनी राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. याशिवाय नाभम द्विवेदी, अंजना लोकरे, आशिष लोकरे, आरती गडदे आणि अस्मिता खटावकर या प्रवाशांना गंभीर मार लागला आहे. अपघाताची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याशिवाय दोन्ही महिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
खोपोली नजीक अपघात झाल्याची माहिती समजताच पोलीस, आयआरबीचे जवान, देवदूत यंत्रणा आणि डेल्टा फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यंत्रणांकडून अपघातग्रस्त वाहनातील जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आलं. अपघातानंतर पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या