New Vande Bharat From Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून आज पासून दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस अशा या गाड्या आहेत. कोल्हापूर ते पुणे अशी ट्रायल रन रविवारी घेण्यात आली. त्यानंतर आज पासून या गाड्या धावणार आहेत. तर नागपूर सिकंदराबाद अशी देखील वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावणार आहे.
पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर येथून राज्यात तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. पुण्याहून स्वतंत्र अशी वंदेभारत या पूर्वी नव्हती. मुंबई-सोलापूर ही वंदे भारत एक्सप्रेस या पूर्वी सुरू करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आज पासून पुणे ते कोल्हापूर व मुंबई ते कोल्हापूर या दोन गाड्या सुरू केल्या जाणार आहे. वंदे भारत ही देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे आहे.
पुण्याच्या पहिल्या वंदे भारतला आज सोमवारी (दि १६) हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. पुणे-कोल्हापूर-हुबळी या गाड्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. पुण्यातून सुरू होणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली व कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे.
आज पासून सुरू होणारी पुणे कोल्हापूर ही पुण्याला मिळालेली पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. यापूर्वी पुण्यावरुन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरु आहे. त्यानंतर आज पासून धावणारी मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. तर पुणे ते हुबळ ही स्वतंत्र गाडी देखील आजपासून धावणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
ट्रेन क्रमांक ०२००१ कोल्हापूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आज पासून कोल्हापूर येथून ४.१५ वाजता सुटेल व त्याच दिवशी १०.४० वाजता पुण्यात पोहोचेल.
तर ट्रेन क्रमांक ०२००३ पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस ही पुण्यातून ४.१५ वाजता सुटेल व त्याच दिवशी ११.४० वाजता हुबळी येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या ८ डब्यांची राहणार आहे.
कोल्हापूर - पुणे - कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) रेल्वे क्रमांक २०६७३ कोल्हापूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) गुरुवार पासून प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि सोमवारी कोल्हापूर येथून ०८.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी १.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक २०६७४ पुणे -कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) बुधवार पासून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पुणे येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि कोल्हापूर येथे त्याच दिवशी रात्री ७.४० वाजता पोहोचेल. ही गाडी मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक २०६७० पुणे - हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस (त्रि-साप्ताहिक) ही गुरुवारपासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी पुणे येथून २.१५ वाजता सुटेल आणि हुबळी येथे त्याच दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २०६६९ हुबळी - पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) दि. बुधवारपासून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी रोजी हुबळी येथून पहाटे ०५.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी १.३० वाजता पोहोचेल.