Nagpur Railway Station Murder Incident : नागपुर रेल्वेस्थानकावर खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मनोरुग्णाने रेल्वे ट्रॅकवरील राफ्टर घेऊन रेल्वेस्थानकावरील नागरिकांना मारत सुटला. या घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीचा पाठलाग करून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम रामअवतार केवट (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. गणेश कुमार डी (वय ५४) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृत व्यक्तिची अद्याप ओळख पटली नाही.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर काही प्रवासी हे गाडीची वाट पाहत उभे होते. यावेळी स्थानकावरील एका मनोरुग्ण व्यक्तीने रेल्वे स्थानकावरील लाकडी राफटर हाती घेत प्रवाशांना मारत सुटला. अचानक झालेल्या घटनेमुळे स्थानकावरील नागरिक घाबरले. आरोपीने स्थानकावरील प्रवाशांच्या डोक्यात राफटर मारला. यात काही प्रवासी जखमी झाले. तर दोघांच्या डोक्यावर वर्मी मार लागल्याने त्यांची प्लॅटफॉर्मवरच मृत्यू झाला. यात मूळचा तामिळनाडू येथील असलेले गणेश कुमार डी यांचा मृत्यू झाला. गणेश कुमार हे दिंडीगुल येथील रहिवाशी आहेत. तर दुसऱ्या मृत प्रवाशाची ओळख पटली नाही. पोलिस या व्यक्तिची ओळख पटवत आहेत.
या घटनेनंतर स्थानकावर गोंधळ उडाला होता. नागरिकांनी आरडा ओरडा केल्यावर आरोपी हा पळून जात होता. त्याने रेल्वे रुळावर उडी मारली. दरम्यान, नागरिकांच्या आवाजामुळे रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस सतर्क झाले.
त्यांनी तातडीने आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आरोपीने हे पाऊल का उचललं याचा तपास रेल्वे पोलिस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून स्थानकावरील प्रवासी भयभीत झाले आहेत. पोलिस दुसऱ्या मृत व्यक्तीची ओळख पटवत आहेत.
संबंधित बातम्या