two hour traffic block on the mumbai pune expressway : राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्ग असणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे जर आज आणि उद्या या महामार्गाने जर तुमच्या प्रवासाचे नियोजन असेल तर ही बातमी महत्वाची आहे. आज बुधवार आणि गुरुवारी या मार्गवार २ तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या काळात या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नवी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. या साठी या मार्गावर वारंवार ब्लॉक घेतला जातो. याच हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीचे काम करण्यासाठी मुंबई व पुणे वाहिनीवर कि.मी. ९३/९०० येथे ३ व ४ एप्रिलला दुपारी १२ ते २ या दरम्यान गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. यामुळे गॅन्ट्री बसविताना मुंबई व पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक या काळात पूर्णतः बंद राहणार आहे.
यामुळे या काळात पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावरुन पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही किवळे ब्रिज वरून वळवून जुना मुंबई - पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात आली आहे. तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कुसगाव टोलनाका कि.मी ५५.००० वरुन (लोणावळा एक्झीट) येथून जुना मुंबई -पुणे मार्गावरुन पुण्याच्या दिशेने वळवण्यात आली आहे, अशी माहिती, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम या मार्गावर बसवण्यात येत आहे. तब्बल ३४० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.