Mumbai-Nashik Highway Accident news: मुंबई नाशिक महामार्गावर नवीन वर्षाच्या सुरतातीला दोन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात ३ जण ठार झाले. तर ६ जण जखमी झाले आहेत. एका अपघातात मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. तर दूसरा अपघात हा एका गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे झाला.
मिळालेल्या माहितीनुसार पहिली घटना ही मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास येथील बोरटेंभे येथे घडली. या ठिकाणी मर्सिडीज कार आणि आयशरची टेम्पोची जोरदार धडक झाली. ही घटना मध्यरात्री घडली. मर्सिडीजने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाही. या घटनेनंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस घोटी हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी बचाव कार्य केले. जखमींना उपचारासाठी तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दूसरा अपघात हा मुंबई-नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी येथे सोमवारी सकाळी ४ च्या सुमारास घडली. एका गाडीचा टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे गाडी ही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला धडकली. या धडकेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. फय्याज शेख (वय ५१), विकास कुमार (वय २१), शिवशंकर विक्रम आदित्य (वय ३३), संतोष कुमार (वय २४) आणि प्रदीप प्रसाद (वय २५) अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.