मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना झाली आहे. येथे भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आरे कॉलनी रोडवरील फिल्म सिटीच्या गेट नंबर २ जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली व ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.
फायर ब्रिगेडच्याअधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईतील गोरेगाव परिसरात प्राइम फॉक्स प्रॉडक्शनच्या पाठीमागे फिल्म सिटी गेट नंबर २ जवळ एक भिंत कोसळली. ही भिंत ६० फूट लांब तर २० फूट उंच होती. भिंत कोसळल्याने या ढिगाऱ्याखाली तीन जण अडकले. यातील दोन जणांचा मृत्यू झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दोन लोकांना रुग्णवाहिकेसोबत आलेल्या डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का, हे पाहिले जात आहे.
शिंतू मंडल (वय ३२) आणि जयदेव बिश्वास (४५) अशी मृत कामगारांची नावे आहेत. आरे कॉलनी पोलिसांनी दोघांचा अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
संबंधित बातम्या