Wardha Laborers Dies News: वर्धा हिंगणघाट रेल्वे मार्गावर कवाडघाट येथे पुलाची पेंटिंग करताना दोन मजुरांचा खाली पडून मृत्यू झाला आहे. या घटनेतील एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या मजुराला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर रेल्वे कंत्राटदाराने पळ काढला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय शर्मा आणि फिरोज खान अशी पुलावरून खाली पडून मृत्यू झालेल्या मुजरांची नावे आहेत. हे मजूर मूळचे राजस्थान येथील असल्याचे बोलले जात आहे. कामधंदा नसल्याने ते वर्ध्यात आले होते. हे दोघेही वर्धा हिंगणघाट रेल्वे मार्गावर कवाडघाट येथे पुलाची पेंटिंग करण्याचे काम करत होते. मात्र, रविवारी सायंकाळी ते पुलावरून खाली पडले. या घटनेत फिरोज खानचा जागीच मृत्यू झाला. तर, विजय शर्मा याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयाचा गेट चक्क पाच तासांनी उघडण्यात विजय शर्माचाही तडफडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर रेल्वे कंत्राटदार चंदन बेंदे याने पळ काढला. बेंदे याने त्याचा मोबाईल देखील बंद करून ठेवला आहे, अशी माहिती अन्य कामासाठी रुग्णालयात आलेल्या एका पोलीस शिपाईने दिली. मजुरांच्या नातेवाईकांना लिहिता वाचता येत नसल्याने तसेच त्यांची बोली भाषा समजत नसल्याने पुढे काय करायचे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.