Pune koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगचा धुडगूस सुरूच; ससून रुगालयात कोयते काढून माजवली दहशत
Pune koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगची दहशत वाढतच आहे. आता पर्यन्त रस्त्यावर असणाऱ्या गुंडांची दहशत आता शासकीय कार्यालयातही दिसत आहे. पुण्यात ससून रुग्णालयात एकमेकांवर कोयते उगारत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी दोन टोळक्यांनी ससून मध्ये येत एकमेकांवर कोयत्याने हल्ला केल्याने आता शासकीय जागा सुद्धा नागरिकांसाठी सुरक्षित नसल्याचे पुढे आले आहे. हडपसर भागातील गुन्हेगारी टोळ्यांनी भांडणातून एकमेकांवर कोयते उगारले. ससून परिसरातील पोलिस आणि सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना अटक केली.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसरमधील रामटेकडी परिसरातील सराईतांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमधील सराईत हडपसर पोलिस ठाण्यात गेले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी देखील त्यांच्या सोबत होते.
दरम्यान, रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाच्या (ओपीडी) बाहेर दोन टोळ्यांमधील सराईत गुन्हेगार कोयते घेऊन एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे अचानक गोंधळ उडाला. या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक घाबरून पळून जाऊ लागले. दरम्यान, पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही गटातील आरोपींना अटक केली. तर काही आरोपी फरार झाले. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.