Malad News: मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या १५ फूट खोल गटाराच्या नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी सायंकाळी ५.२४ वाजता मालाड अंबुजवाडी परिसरातील मालवणी गेट क्रमांक ८ जवळ ही घटना घडली.
मालाड पश्चिम येथे गुरुवारी संध्याकाळी एका खाजगी कंत्राटदाराच्या सार्वजनिक शौचालयाच्या गटारात तीन जण पडले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमीवर कांदिवली येथील बीडीबीए रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज केवट (वय, १८) आणि विकास केवट (वय, २०) अशी मृतांची नावे आहेत. तर, रामलगन केवट (वय, ४५) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्घटनाग्रस्त एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या