MSRTC Buses Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर राज्य परिवहनच्या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, ६४ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील वरवंड गावाजवळ सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुण्याकडे जाणाऱ्या बसने सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसला धडक दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. पुण्याकडे जाणाऱ्या बससमोर अचानक एक दुचाकी आली. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस दुभाजकाला धडकून समोरून येणाऱ्या बसला धडकली.
या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकूण ६४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बसमध्ये ११० हून अधिक प्रवासी होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास केला जात आहे.
पनवेल सायन महामार्गवर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणारे दोन जण जागीच ठार झाले. प्रथम म्हात्रे (वय, २०) आणि त्याची मैत्रीण साक्षी जाधव (वय, १९) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे देघेही लोणावळा येथील आई एकविरा येथे दर्शन घेऊन मुंबई चेंबूर येथे घरी परतत असताना सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी हा अपघात घडला.
चेंबूर येथील जीजामाता नगर येथे राहणार प्रथम म्हात्रे हा आपले मित्र आणि मैत्रिणींसोबत शनिवारी सकाळी श्री क्षेत्र आई एकविरा लोणावळा येथे दर्शन करण्यासाठी मोटारसायकल वरून गेला होता. प्रथम म्हात्रेने भायखळा येथील औद्योगिक प्रशिक्षणचे शिक्षण आयटियाचे नुसतेच शिक्षण पूर्ण केले. त्याने दसऱ्याच्या दिवशी नवीन मोटारसायकल खरेदी केली होती. प्रथम हा शिकावू मोटारसायकलस्वार होता. त्याला अजूनतरी मोटारसायकलचे पूर्ण प्रशिक्षण घेतले नव्हते, अशीही माहिती समोर आली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत श्री क्षेत्र आई एकविराचे दर्शन घेऊन परत येत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.