Nashik road news : नाशिक रोड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिक रोड हळहळले आहे. येथील म्हसोबानगरात राहणारे तसेच सोबतच एकत्र खेळत लाहाणाचे मोठे झालेल्या दोन १७ वर्षीय जिवलग मित्रांनी एक्सप्रेसपुढे येत स्वत:ला झोकून देऊन जीवन संपवले.
सचिन दिलीप करवर (वय १७), संकेत कैलास राठोड (वय १७) असे आत्महत्या केलेल्या दोन बालमित्रांची नावे आहेत. दोघांच्याही घरची परिस्थिती बेताची असून दोघेही कामधंदा करून कुटुंबाला हातभारसुद्धा लावत होते. सचिनचे वडील मालधक्का येथे मजुरी करतात तर संकेतचे वडील मिस्तरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सचिन आणि संकेतने नुकतीच अकरावीची परिक्षा उत्तीर्ण केली होती. ते १२ वीत प्रवेश घेणार होते. मात्र, त्या आधीच त्यांनी स्वत:चे जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार सचिन आणि संकेतहे जिवलग मित्र होते. खास मित्र म्हणून ते या भागात परिचित होते. हे मित्र नसून सख्खेच भाऊच आहे असे अनेकांना त्यांच्या मैत्रीवरून वाटायचे. मात्र, अचानक दोघांनी टोकाचा निर्णय घेत शनिवारी (दि.८) सायंकाळी स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' अशी पोस्ट टाकत वालदेवी नदीजवळून जाणाऱ्या रेल्वे रूळावर जात एका एक्सप्रेस रेल्वेपुढे त्यांनी स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. त्यांच्या या निर्णयामुळे नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती म्हसोबानगर परिसरात नागरिकांना मिळताच अनेकांना धक्का बसला. दोघांच्या घराबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रविवारी दुपारी नाशिक रोड येथील देवळालीगाव स्मशानभूमी दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला या बाबत त्यांचे कुटुंबीय देखल अनभिज्ञ आहेत. दरम्यान, पोलिस त्यांच्या या निर्णयाचे कारण शोधत आहे.