Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडा तालुक्यातील तिलारी धरणे येथे रिव्हर क्रॉसिंग प्रशिक्षणादरम्यान दोन जवांनाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तर, चार जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जवान विजयकुमार दिनवल (वय- २८, मूळचा राजस्थान) आणि दिवाकर रॉय (वय- २६, मूळचा पश्चिम बंगाल) असे बुडून मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. हे दोघेही जवान बेळगाव येथील जेएल विंग कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत होते. रिव्हर क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी जेएल विंग कमांडो ट्रेनिंग सेंटरमधील दोन गट कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडा तालुक्यातील तिलारी धरणावर आले होते. नदी ओलांडण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सहा जवानांचा एक गट बोटीने धरणाच्या मध्यभागी पोहोचला, तेव्हा त्यांची बोट उलटली. या घटनेत विजयकुमार दिनवल आणि दिवाकर रॉय या दोन जवानांचा मृत्यू झाला. तर, चार जणांना वाचवण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच जेएल विंग कमांडोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमके बोट कशामुळे बुडाली? यबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून याचे कारण शोधण्यासाठी अधिकारी परिसराची पाहणी करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.