नागपूर: पुणे विमानतळावर काही दिवसांपूर्वी गुप्तांगात सोन्याचे कॅप्सुल लपवून तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता नागपूर विमानतळावर देखील सोने तस्करीची एक घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी सोन्याची पेस्ट करून ती कपड्यात लपवली होती. मात्र, कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पळून जाण्याच्या आधीच पकडले. त्यांच्याकडून तब्बल ८७ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी ही मूळचे कर्नाटक येथील आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विमानतळावर दोघे जण सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर कतार येथून आलेल्या विमानातून शाहिद आणि सौदागर हे दोघे आले.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांची तपासणी केली असता दोघांनी शरीरावर घातलेल्या कपड्यात पावणे दोन किलो सोनं पेस्ट स्वरूपामध्ये लपवून ठेवल्याचे सापडले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कस्टम विभागाने मोठ्या प्रमाणात सोने तस्करांवर कारवाई केली आहे. पुण्यात ५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एका महिलेने गुप्तांगात लपवून हे सोने आणले होते.
संबंधित बातम्या