Pune Crime news : पुण्यात चित्रपटाप्रमाणे घरातच काही तरुणांनी ५०० च्या नोटा छापून त्या बाजारात चालवण्याची घटना उघडकीस आली आहे. या नोटा चलनात आणण्यासाठी हिंजवडी परिसरात घेऊन जात असतांना माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या सोबतच त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
अभिषेक राजेंद्र काकडे (वय २०), ओंकार रामकृष्ण टेकम (वय १८, दोघे रा. हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
या नोटा आरोपींनी घरातच तयार केल्याचा संशय आहे. दरम्यान, या नोटा पाहता या मागे मोठी आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली असून या बाबत रविवारी पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये कुर्डुवाडीतील टेंभुर्णी चौकात ग्रामीण गुन्हे शाखेने चौघांना अटक केली होती. या लोकांनी उरळी देवाची येथून प्रिंटर मशिन व सामान आणून ५०० रुपयांच्या काही नोटा तयार केल्या होत्या. त्यावेळी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बांगलादेशातून बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली होती.
दरम्यान, शुक्रवारी देखील काही आरोपी बनावट ५०० च्या नोटा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत हींजवडी येथे शुक्रवारी दोघांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून बनावट भारतीय नोटा जप्त केल्या.
संबंधित बातम्या