Two agniveer died in Nashik artillery centre : नाशिकचा देवळाली येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. तोफखाना सरावा दरम्यान, मोठा स्फोट झाल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी फायरिंग रेंजमध्ये 'आयएफजी इंडियन फिल्ड गन'ने फायरिंग सुरु असतांना हा मोठा स्फोट झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
गोहिल विश्वराज सिंग (वय २०), सैफत शित (वय २१) अशी शहीद झालेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या येथे भारतीय लष्कराचे आर्टिलरी सेंटर आहे. या ठिकाणी बोफोर्स पासून विविध तोफांचे प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी गुरुवारी अग्निवीरांना दुपारी 'आयएफजी इंडियन फिल्ड गन'ने प्रशिक्षण दिले जात होते. या वेळी फायरिंग करत असताना अचानक एका बॉम्बगोळ्याचा स्फोट झाला. स्फोटांमुळे बॉम्ब गोळ्याचे तुकडे हे अग्निवीर जवानांच्या शरीरात घुसले. यात दोघेही गंभीररि जखमी झाल्याने त्यांना तातडीने लष्कराच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाला दरवर्षी लाल किल्ल्यावर २१ तोफांची सलामी दिली जाते. या साठी आता भारतीय बनावटीच्या 'इंडियन फील्ड गन'चा वापर केला जातो. ही इंडियन फील्ड गन तीन प्रकारची आहे. एमके १, एमके २ व ट्रक माउंटेड फील्ड गन या तीन प्रकारात ही तोफ येथे. ही तोफ वजनाने हलकी असून ती कोठेही सहजतेने नेता येते.
केंद्र सरकारने २०२२ साली सुरू केलेल्या अग्निपथ योजने अंतर्गत तरुणांची लष्करामध्ये भरती केली जाते. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या तरूणांना अग्निवीर म्हटले जाते. चार वर्षांसाठी त्यांची निवड केली जाते. त्यांना मासिक वेतनासह १० ते १२ लाख रूपयांची मोठी रक्कम ४ वर्षांनंतर दिली जाते. या साठी तरूणांना १७ ते २३ अशी वयाची अट आहे.
संबंधित बातम्या