Soygaon Murder Case : संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती; प्रेमप्रकरणातून भावांनी बहिणीचे केले तुकडे
Sambhajinagar Crime News : 'माझा जीव वाचवा, मला कुठे तरी लपवा', अशी आर्त बहीण देत होती. तरीदेखील सख्ख्ये भाऊ धारदार शस्त्राने वार करत होते.
Sambhajinagar Crime News Marathi : छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कारण प्रेमप्रकरणातून दोन भावांनी आपल्या सख्ख्या बहिणीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर असं मृत महिलेचं नाव असून कृष्णा धोडिंबा बावस्कर, शिवाजी धोडिंबा बावस्कर, धोडिंबा सांडू बावस्कर आणि शेवंताबाई धोडिंबा बावस्कर अशी आरोपींची नावं आहे. फर्दापूर पोलीस ठाण्यात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या राक्षा शिवारात राहणाऱ्या चंद्रकला बावस्कर यांचं एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या आई-वडिलांना आणि भावांना होता. घरात झालेल्या वादातून कृष्णा आणि शिवाजी या दोन सख्ख्या भावांनी आपल्याच बहिणीवर कुऱ्हाडीनं वार करायला सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकला यांनी जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेरील शेतात पळ काढला. परंतु दोन्ही भावांनी बहिणीचा पाठलाग करत तिच्या डोक्यात आणि छातीत कुऱ्हाडीनं वार करत तिची हत्या केली. याशिवाय चंद्रकला हिला वाचवण्यासाठी आलेल्या शमीम नावाच्या तरुणावरही आरोपींनी हल्ला चढवला. त्यानंतर जखमी शमीम यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिसांनी तातडीने राक्षा शिवारात धाव घेतली. त्यानंतर मृत चंद्रकला यांचा मृतदेह पोलिसांनी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी घटनेचा पंचनामा करत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. बहिणीची हत्या करून कृष्णा आणि शिवाजी हे दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे. सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यानंतर आता लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.