मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhangar Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजही आक्रमक, मंत्री विखे- पाटलांवर भंडारा उधळला!

Dhangar Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजही आक्रमक, मंत्री विखे- पाटलांवर भंडारा उधळला!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 08, 2023 07:27 PM IST

Turmeric Thrown on Radhakrishna Vikhe Patil: सोलापूरात धनगर समाजातील कार्यक्रत्यांनी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil on Dhangar Reservation: मराठा समाजानंतर आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. याच मुद्द्यांवर बोलण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनगर समाजातील आंदोलकांशी भेट घेतली. मात्र, विखे पाटील बोलत असताना आंदोलकांनी त्यांच्यावर भंडारा उधळला. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

ट्रेंडिंग न्यूज

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर विखे पाटील यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांची भेट घेतली. मात्र, निवेदन देत असताना एका कार्यकर्त्याने खिशातून भंडाऱ्याची पुडी काढून विखे पाटलांच्या डोक्यावर ओतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले. यावर विखे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली. विखे पाटील म्हणाले की, “भंडारा पवित्र असतो. पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंद आहे. प्रतिकात्मक गोष्टी करण्याची कार्यकर्त्यांची भावना असते. त्यांनी काही चुकीचे केले, असे मला वाटत नाही”, असे विखे पाटील म्हणाले.

विखे पाटील यांच्या डोक्यावर भंडाळा उधळताच सुरक्षा रक्षकांनी संबंधित कार्यकर्त्याने मारहाण केली. यावर विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये जे काही घडले, ते स्वभाविक आहे. असा अचानक गोंधळ झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया उमटत असते. कार्यकर्त्यांना त्या क्षणी जे योग्य वाटले, ते त्यांनी केले आणि सुरक्षा रक्षकही संरक्षणासाठीच असतात”, असे विखे पाटील यांनी म्हटले.

भंडारा उळधणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, “ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला, त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. याबाबत मी प्रशासनाला आदेश दिले आहेत.”

WhatsApp channel