मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ट्रक व टँकर चालकांचा संप, मात्र राज्यभरातील एसटीची चाके थांबण्याची शक्यता

ट्रक व टँकर चालकांचा संप, मात्र राज्यभरातील एसटीची चाके थांबण्याची शक्यता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 04:20 PM IST

Petrol-Diesel shortage In Maharashtra : केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक व टँकरचालकांनी संप पुकारला आहे. याचा फटका एसटीलाही बसण्याची शक्यता आहे. डिझेलअभावी एसटी बससेवा टप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Petrol-Diesel shortage In Maharashtra
Petrol-Diesel shortage In Maharashtra

Hit and Run Law : केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. नव्या वर्षाची सुरूवातच संपाने झाल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत आहे. भाज्यांचे दर कडाडले आहेत, काही शहरातील स्कूल बस झाल्या आहेत, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने पेट्रोल पंपांवर गर्दी आहे. त्यातच आता डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संप लांबला तर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीने वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी सोमवार रात्रीपासून पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी केली आहे. ट्रक-बस चालकांच्या संपाचा फटका एसटीलाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटीच्या फेऱ्या बंद झाल्यास जनतेला या संपाची अधिक झळ बसणार आहे.

 

वाहतूकदारांच्या संपामुळे ठाण्यात अनेक पेट्रोल पंपातील पेट्रोल संपल्यामुळे बंदच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.
वाहतूकदारांच्या संपामुळे ठाण्यात अनेक पेट्रोल पंपातील पेट्रोल संपल्यामुळे बंदच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.

राज्य महामंडळाच्या प्रतिदिन सरासरी १४ हजार बसेसधावत असतात. या बसेसाठी दररोज सरासरी ११ लाख लिटर डिझेल लागते. एसटीच्या बसेससाठी इतक्या प्रमाणात डिझेलची पूर्तता न झाल्यास एसटीची चाके थांबण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एसटीमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील दोषींना १० वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारपासून निदर्शने आंदोलन सुरू केले आहे.

 

वाहतूकदारांच्या संपामुळे ठाण्यात अनेक पेट्रोल पंपातील पेट्रोल-डिझेलसाठा संपला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाहतूकदारांच्या संपामुळे ठाण्यात अनेक पेट्रोल पंपातील पेट्रोल-डिझेलसाठा संपला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूर आणि विदर्भात ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. यामुळे येथील इंधन व अन्य मालाचा पुरवठा आता सुरळीत होणार आहे. कोल्हापुरातही संप मागे घेण्यात आला आहे. सांगलीत पुरेसा इंधन पुरवठा असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. सोलापूरमधील पेट्रोलियम ट्रकचालकांनी अद्याप संप मागे न घेतल्यानं सोलापूरमध्ये इंधन तुटवडा होण्याची शक्यता आहे. ठाण्यात परिस्थिती आणखी बिकट झाली असून अनेक पेट्रोल पंंप इंधन साठा संपल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. तशा पाट्या लावण्यात आल्या असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग