Pune Crime News : पुण्यात वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवणाचे बिल दिले नाही म्हणून मित्राच्या अंगावरून कंटेनर घालून त्याची चिरडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम दत्ता पुरी असं आरोपीचे नाव आहे. तर परमेश्वर बालाजी देवराये असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी राम व परमेश्वर हे एकच ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. गुरुवारी रात्री दोघे १० च्या सुमारास जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. येथे जेवणाच्या बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. जेवण केल्यावर आरोपी राम व परमेश्वर दोघंही ट्रक लावलेल्या गोदामाजवळ आले. यावेळी पुन्हा परमेश्वर व राममध्ये वाद झाले. जेव्हा परमेश्वर हा कंटेनरजवळ थांबला होता. यावेळी आरोपी रामने अचानक कंटेनर ट्रक सुरू केला व परमेश्वरच्या अंगावर घातला. कंटेनरच्या चाकाखाली आल्याने परमेश्वरचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत परमेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या दोघांसोबत असलेला तिसरा सहकारी रामचंद्र पोळे याने या प्रकरणी फिर्याद दिली असून राम दत्ता पुरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे,
संबंधित बातम्या