new year chakka jam against Motor Vehicle Act : केंद्रातील मोदी सरकारनं आणलेल्या नव्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात ट्रकचालकांनी देशभरात संप पुकारला आहे. राज्यातही ठिकठिकाणच्या महामार्गावर ट्रक उभे करून चालक रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत. उरण-जेएनपीटी मार्गावर जमावानं पोलिसांवर बांबूनं हल्ला चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात केंद्र सरकारनं नवा मोटार वाहन कायदा आणला आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाल्यास १ ते २ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता, मात्र नवीन कायद्यात १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसंच, हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात आला आहे. या नव्या कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
याच नाराजीला वाचा फोडण्यासाठी उरण-जेएनपीटी मार्गावर आज ट्रक चालकांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोला हिंसक वळण लागलं. या रस्त्यावरून पुढं जाणाऱ्या इतर गाड्यांनाही आंदोलकांनी मज्जाव केला. तसंच, आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांच्याच लाठ्या घेऊन हल्ला करण्यात आला. त्यामुळं प्रचंड तणाव निर्माण झाला.
या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी काही ट्रकचालकांना ताब्यात घेतलं. तर काही चालक पळून गेले. कळंबोलीतही असाच प्रकार घडला आहे. पोलिसांनी आंदोलक ट्रक चालकांची धरपकड सुरू केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारनं आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. दुचाकी व चारचाकी वाहन चालवण्यासही भीती वाटावी असा हा काळा कायदा आहे. ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 'हा काळा कायदा मंजूर करून घेण्यासाठीच मोदी सरकारनं विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केलं, असा आरोपही पटोले यांनी केला.