Nandurbar Bandh Today : मणिपूर बलात्कार प्रकरणावरून आदिवासी संघटना आक्रमक, नंदूरबारमध्ये आज बंदची हाक
Manipur Gang Rape Case : तीन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढून बलात्कार करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आला आहे.
Manipur Gang Rape Case : मणिपुरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रासह देशभरात राजकीय वाद पेटला आहे. त्यातच आता मणिपुरमध्ये ७०० ते ८०० लोकांच्या जमावाने तीन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून अनेकांनी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मणिपुरमधील घटनेवरून राज्यातील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहे. आदिवासी संघटनांनी मणिपूर येथील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
नंदूरबारमध्ये आज पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये जवळपास १७ हून अधिक आदिवासी संघटनांनी सहभाग घेतला आहे. सकाळी ११ वाजेपासून शहरातील मुख्य चौकात घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती आहे. नंदूरबार बंदसाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून प्रतिसाद देण्याचं आवाहन आदिवासी संघटनांकडून करण्यात आलं आहे. बंदवेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामुळं आता मणिपुरमधील घटनेचे पडसाद राज्यातील नंदूरबार जिल्ह्यात पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये निदर्शने...
मणिपूर येथील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी युवक क्रांती दल तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुणे आणि औरंगाबादेत निषेध मोर्चा काढला होता. यावेळी घटनेचा निषेध करत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याशिवाय मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूर आणि राज्यातील अन्य ठिकाणीही मणिपुरमधील घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तीन महिलांच्या बलात्कार प्रकरणात मणिपूर पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून करण्यात येत आहे.