Mumbai Rain: मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भारताची आर्थिक राजधानी ठप्प झाली. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक भागांत गुडघाभर पाणी साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाइन असलेल्या मुंबई लोकलचा पाण्यातून धावतानाचा व्हिडिओ समोर आला.
@Madan_Chikna या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये मुंबई लोकल ट्रेनचे इंजिन आणि पहिला डबा दिसत आहे. ही ट्रेन पाण्याखाली गायब झालेल्या रुळांवरून जात आहे. तर, बाजूच्या लोकलमधून जाणारी प्रवासी या ट्रेनचा व्हिडिओ काढत आहेत. हा व्हिडिओ ८ जुलै रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत १.६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. मात्र, हा व्हिडिओ नेमकं कुठला आणि कधीचा आहे? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
एका एक्स युजरने एका व्हिडिओ गेमचा संदर्भ देत लिहिले की, "जेव्हा तुम्ही जीटीए व्हाइस सिटीमध्ये 'सीवेज' टाइप करता. '३१ जुलैपूर्वी कर भरणे लक्षात ठेवा', असा टोला ही त्यांनी लगावला. तिसऱ्याने म्हटले की, 'छान, वॉटर राइड्स!' आणखी एका जणाने अशी कमेंट केली आहे की, "याला आपण वॉटर लोकल म्हणायचे का?". हे खूप भीतीदायक आहे, अशीची चिंता एकाने व्यक्त केली.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईत ९ जुलैसाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले.
-नद्या आणि कालव्यांवरील पूरग्रस्त पूल ओलांडू नयेत.
- पर्यटकांनी पाणवठे, धरणे, नदीकाठ, घाट टाळावेत.
- विजेच्या वेळी भक्कम छताखाली आश्रय घ्या.
- मुसळधार पावसात जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेणे टाळा.
- आपत्कालीन परिस्थिती शांतपणे हाताळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
- मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.