Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Dec 27, 2024 11:44 PM IST

Palghar Railway Accident : मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसने पालघर स्टेशनजवळ तीन जणांनी उडवले. यात२ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर आहे.

पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात
पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात

Palghar Railway Accident : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसने तीन जणांनी उडवले. यात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर आहे. पालघरच्या विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाशेजारी हनुमान मंदिर चौक येथील एका बंद रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. रेल्वे रुळ क्रॉस करत असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पालघर रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिर चौक येथील बंद फाटकाजवळ मुंबई-जयपूर या भरधाव ट्रेनने ३ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. ट्रेनच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोनू राम (३५), मोनू कुमार (१९) अशी मृतांची नावे असून अनुप पंडित (२०) हा तरुण जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमीवर पालघर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याची सांगितले जात आहे. 

 बोईसर पूर्व येथे एका उद्योगात वेल्डिंग व इतर काम करणारे बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातील हे तीन तरुण आज सुट्टी असल्याने घरातील काही सामान आणण्यासाठी पालघर शहरात आले होते. पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना मुंबईहून जयपूरकडे जाणाऱ्या ट्रेननं त्यांना उडवलं. दोन रुळाच्या मधोमध थांबलेल्या दोन तरुणांना दोन्ही बाजुंनी ट्रेन आल्याने धक्का लागून ते जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या खाली आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. या तिघांपैकी एक तरुण लघुशंखेसाठी बाजूला गेल्याने या अपघातात जखमी झाला आहे.

पालघर रेल्वे स्टेशनच्या आसपास अनेक ठिकाणी रेल्वे रुळ अवैधरित्या ओलांडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत. बंद फाटकांवर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी समोर येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर