Kokan Railway News Today: कोकण रेल्वे मार्गावर उडुपीजवळील संभाव्य अनर्थ रेल्वे रुळ सांभाळणारे प्रदीप शेट्टी यांच्या सतर्कतेमुळे टळला. रविवारी पहाटे सव्वादोन वाजता शेट्टी यांना इनांजे ते पाडुबिद्री दरम्यान ट्रॅक वेल्ड बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना या बिघाडाची माहिती दिल्याने संभाव्य रेल्वे अपघात टळला. रुळावरील बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आला आणि पहाटे ५ वाजून ५८ मिनिटांनी ट्रॅक-फिट प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्यावर धावणाऱ्या गाड्यांना ताशी २० किमी वेगाचे बंधन घालण्यात आले.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी शेट्टी यांच्या तत्परतेची दखल घेत तातडीने २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. दुपारी ट्रॅक साइटवर शेट्टी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारवारकडे जाणाऱ्या पंचगंगा एक्स्प्रेसमधील प्रवासी विशाल शेणॉय यांनी सांगितले की, पडुबिद्रीपासून दक्षिणेला सुमारे ९ किमी अंतरावर असलेल्या नंदिकूर स्थानकात गाडी थांबविण्यात आली होती. त्याचवेळी तिरुवनंतपुरम सेंट्रलकडे जाणारी नेत्रावती एक्स्प्रेसही इनांजे येथे थांबविण्यात आली.
शेणॉय यांनी रुळ दुरुस्तीच्या कामासाठी पाडुबिद्रीच्या दिशेने जाणारी रेल्वे मेंटेनन्स व्हेइकल पाहिली. गाडी क्रमांक १६३४५ ही मुंबई एलटीटी-तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस उडुपीहून पहाटे ३ वाजता निघणार होती, तर गाडी क्रमांक १६५९५ ही केएसआर बेंगळुरू-कारवार पंचगंगा एक्स्प्रेस रविवारी पहाटे ४ च्या सुमारास प्रभावित भागातून जाणार होती. रुळातील बिघाड दूर होईपर्यंत दोन्ही गाड्या थांबल्या होत्या. कोकण रेल्वेच्या जनसंपर्क व्यवस्थापक सुधा कृष्णमूर्ती यांनी वेगावर निर्बंध असतानाही ट्रॅकला सुरक्षित ऑपरेशनचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली. मात्र, रेल्वे रुळातील बिघाडाचे कारण कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.
वसई आणि नायगांव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २२ जानेवारी रात्री ८.५० वाजता घडली. रेल्वे ट्रॅक फेल्युअर चे काम हे तीन कर्मचारी करत असताना हा अपघात झाला.
संबंधित बातम्या