Thane Traffice Updates : मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी ठाण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या खांबावर तुळई बसविण्यात काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळं घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत मध्यरात्रीसाठी बदल करण्यात आला आहे. त्यामुळं ठाण्यातून गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या अवजड वाहनांना रविवारच्या मध्यरात्रीपर्यंत प्रवेश नाकारण्यात आला आहे. याशिवाय घोडबंदर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळं आता ऐन वीकेंडच्या दिवशीच ठाणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात मेट्रोचं काम हाती घेण्यात आलं आहे. हे काम रात्रीच्या वेळी करण्यात येणार असल्यानं मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कशेळी-काल्हेर-अंजूरफाटा या पर्यायी मार्गानं वळविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. त्यामुळं आता पर्यायी मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरून घोडबंदरच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना कापूरबावडी चौकात थांबवण्यात येणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना माजीवाडा पूल-खारेगाव टोलनाका-मानकोली-अंजुर फाटा-बाळकूम-कशेळी या नव्या मार्गानं प्रवास करता येणार आहे.
मुंब्रा-कळव्यातून घोडबंदरच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाक्याजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळं वाहनचालकांना गॅमन मार्गे खारेगाव खाडी पूलाखालून-खारेगाव टोलनाका-मानकोली-अंजुर फाटा या मार्गांचा वापर करावा लागेल. तसेच गुजरातहून ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाक्यावर प्रवेश नाकारण्यात आला आहे. याशिवाय मुंबई-वसई-विरार येथून येणाऱ्या वाहनांना फाऊंटन हॉटेल जवळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळं वाहनचालकांना चिंचोटी नाका-कामण-अंजुरफाटा आणि माणकोली या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.