Pune Palkhi Marg News : आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुण्यात दाखल झाली आहे. विठुरायाच्या जयघोषात वारकरी पंढरपुराच्या दिशेने निघाले आहे. वारीसाठी निघालेले वारकरी पुण्याच्या नाना पेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम ठोकणार आहे. नाना पेठेतील मंदिरात मुक्काम केल्यानंतर वारकरी पुन्हा पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. परंतु त्यापूर्वीच आता पुणे पोलिसांनी शहराच्या वाहतुकीत मोठा बदल केला आहे. शहरातील मध्य भागातील वाहतूक बंद करून पर्यायी रस्ते सूचवण्यात आले आहे. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं पुण्यात पालखी आलेली असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे.
पालखी पुण्यात दाखल झाल्याने पोलिसांनी शहरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहे. त्यात गणेशखिंड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक चौक ते वीर चापेकर चौक, बेलबाग चौक ते टिळक चौक आणि भवानी पेठेतील अनेक रस्ते बंद राहणार आहे. यावेळी पुणेकरांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेशखिंड मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांसाठी रेंजहिल्स-खडकी- पोल्ट्री चौक- मुंबई- पुणे महामार्ग-रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्ता या मार्गाचा वापर करता येणार आहे. फर्ग्युसन रोडवरून जाणाऱ्या वाहनांना कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता आणि रेंजहिल्स हा पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.
शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कुंभार वेस-मालधक्का चौक- आरटीओ चौक- जहांगीर हॉस्पिटल आणि बंडगार्डन रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. तसेच लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक शिवाजी रस्ता- हिराबाग टिळक रस्ता आणि शास्त्री रोडवरून वळवण्यात आली आहे. तसेच पालखी नाना पेठेतील मंदिरात मुक्कामी असणार आहे. त्यामुळं भवानी पेठेतील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. पालखी पुण्यातून बाहेर गेल्यानंतर सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या