Pune Helmet Sakti : पुण्यात हेल्मेट सक्तीचा फार्स; कारवाईचा पडला पोलिसांना विसर
Pune Helmet Sakti : पुण्यात हेल्मेट सक्तीचा फार्स झाल्याचे दिसून येत आहे. विना हेल्मेट वाहनचाकांवर कारवाई करण्यास पोलिस उदासीन असल्याचे दिसत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात कारवाई कमी झाली आहे.
पुणे : पुण्यात काही वर्षापूर्वी मोठ्या धडाक्यात हेल्मेट सक्ती राबवण्यात आली होती. मात्र, या हेल्मेट सक्तीला पुणेकरांनी झुगारून लावले होते. असे असले तरी पोलिसांनी मात्र, कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. मात्र, या कारवाया करण्याचे पोलिसांना विसर पडल्याचे चित्र आहे. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात कारवाईत घट झाल्याचे अकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या सीसीटीव्हीच्या आधारेच ही कारवाई करत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
पुणे हे सर्वाधिक वाहन असलेले शहर झाले आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर अपघातही वाढले आहेत. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाते. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्याची आकडेवारी पाहिल्यास हेल्मेटसक्तीची कारवाई वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र, फेब्रुवारीपासून त्यात घट सुरू झाली. मार्चमध्येही ही कारवाई मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.
जानेवारी महिन्यात हेल्मेटसक्तीची कारवाई ७२ हजार ६६८ जणांवर करण्यात आली. यात सीसीटीव्हीद्वारे केलेली कारवाई जास्त असून, प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी केवळ १४ जणांवर कारवाई केली. एकूण कारवाई केलेल्यांपैकी ४ हजार ६४६ जणांनी दंड भरला.
तर फेब्रुवारी महिन्यात हेल्मेट कारवाईचा आकडा २४ हजार ३६१ वर आला. जानेवारीचा विचार करता फेब्रुवारीतील कारवाई केवळ ३० टक्केच आहे. त्यात रस्त्यांवर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून केवळ २२ जणांवर कारवाई केली असून, उरलेली सर्व कारवाई सीसीटीव्हीद्वारे करण्यात आली आहे. त्यातही दंड भरणाऱ्यांची संख्या १ हजार ६१ आहे. १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत केवळ १३ हजार ४०१ जणांवर हेल्मेटसक्तीची कारवाई केली आहे. त्यातही रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी ३२ जणांवर केलेली कारवाई वगळता सर्व कारवाई सीसीटीव्हीद्वारे झालेली आहे. एकूण कारवाईपैकी फक्त ३०३ दुचाकीस्वारांनी दंड भरला आहे.