मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uran Accident : उरणजवळ भरधाव कंटेनर उलटला; रस्त्यावर केमिकल सांडल्यानं मोठी वाहतूक कोंडी

Uran Accident : उरणजवळ भरधाव कंटेनर उलटला; रस्त्यावर केमिकल सांडल्यानं मोठी वाहतूक कोंडी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 26, 2022 12:12 PM IST

Container Accident In Uran : महामार्गावर दोन वाहनांमध्ये अपघात झाल्यानंतर केमिकल घेऊन जाणारा कंटेनर रस्त्यावर उलटला. त्यामुळं जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

Container Accident On JNPT-Palspey National Highway
Container Accident On JNPT-Palspey National Highway (HT_PRINT)

Container Accident On JNPT-Palspey National Highway : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची घटना ताजी असतानाच आता उरणनजीक जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, कंटेनर रस्त्यावर उलटल्यानं मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडलं. परिणामी महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळं पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरील धुतुम व चिर्ले या गावादरम्यान केमिकलची वाहतूक करणारा कंटेनर उलटला. कंटेनर रस्त्यातच आडवा उलटल्यानं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळं दोन्ही बाजुंनी पाच किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद केली.

कंटेनर उलटल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय अग्निशमक दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त कंटेनरला रस्त्यावरून हटवण्यात आलं असून त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर कंटेनरमधील केमिकल रस्त्यावर सांडलं. त्यामुळं वाहतूक कोंडी झाली. परंतु कंटेनरला हटवण्यासाठी महामार्ग बंद करावा लागला. त्यानंतर आता कंटेनरला हटवण्यात आलं असून महामार्ग पुन्हा खुला करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

IPL_Entry_Point