tourists attacked by bees near shivneri : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले शिवनेरीवर पर्यटनासाठी आलेल्या ७० पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात काही लहान मुलांसह काही पर्यटक गंभीर जखमी झाले आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे किल्ल्यावर गोंधळाचे वातावरण झाले होते. जखमी पर्यटकांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याजवळ असणाऱ्या तुळजा लेणी येथे मुंबई आणि पुण्याहून काही पर्यटक आज पर्यटनासाठी आले होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने देखील अनेक पर्यटक किल्ले शिवनेरी परिसरात फिरण्यासाठी आले होते. शिवजयंती असल्याने देखील तुळजालेणी येथे पर्टक आले होते.
दरम्यान, दुपारच्या वेळी काही हुल्लडबाज तरुणांनी मधमाशांच्या मोहोळावर दगड मारला. यामुळे मोहोळ उठून मधमाशांनी थेट पर्यंटकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ७० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटक घाबरून पळू लागले. यात किल्ल्याच्या पायऱ्यावरुन घसरून पडून काही पर्यटक जखमी झाले. तर काही लहान मुलांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी झाले आहे. या पर्यटकात पुणे, मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह महिला, जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
किल्ले शिवनेरीवर शिव जयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सोमवारी (दि १९) शिवनेरीवर या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सकाळपासूनच हजेरी लावणार आहेत. या साठी पोलिसांकडून जय्यत तयारी सुरू आहे. पास देऊनच किल्ल्यावर प्रवेश दिला जात आहे. मात्र ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या