Drugs Case : संभाजीनगरमध्ये तब्बल ५०० कोटींचं कोकेन जप्त, पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Drugs Case : संभाजीनगरमध्ये तब्बल ५०० कोटींचं कोकेन जप्त, पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड

Drugs Case : संभाजीनगरमध्ये तब्बल ५०० कोटींचं कोकेन जप्त, पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड

Oct 22, 2023 06:04 PM IST

Sambhajinagar Drugs Case : पुण्यातील ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजत असतानाच आता संभाजीनगरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे.

Sambhajinagar Drugs Case
Sambhajinagar Drugs Case (HT)

Sambhajinagar Drugs Case : पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्जची तस्करी केली जात असल्याची घटना समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता मराठवाड्यातही ड्रग्ज आणि कोकेनच्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. डीआरआयच्या पुणे पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरात छापेमारी केली आहे. त्यामध्ये पोलिसांनी तब्बल ५०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलं आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डीआरआय पथकाला छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०० कोटींचं कोकेनची खेप येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने पोलिसांच्या मदतीने संभाजीनगर शहरात सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी शहरातील काही ठिकाणी छापेमारी करत तब्बल ५०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलं आहे. त्यामुळं संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही. याशिवाय या छाप्याबद्दलचं कोणतंही स्पष्टीकरण अद्याप डीआरआयकडून देण्यात आलेलं नाही.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील ससून रुग्णालयात दीडशे कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलं होतं. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार ललित पाटील याला पोलिसांनी तामिळनाडूतून अटक केली होती. पुण्यातील ड्रग्ज केसवरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर शहरातही कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर