Illegal Hoardings: मुंबईतील बेकायदा होर्डिंगविरोधात तक्रार करायचीय? ‘या’ हेल्पलाइन क्रमांकावर करा फोन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Illegal Hoardings: मुंबईतील बेकायदा होर्डिंगविरोधात तक्रार करायचीय? ‘या’ हेल्पलाइन क्रमांकावर करा फोन

Illegal Hoardings: मुंबईतील बेकायदा होर्डिंगविरोधात तक्रार करायचीय? ‘या’ हेल्पलाइन क्रमांकावर करा फोन

Jan 23, 2025 06:41 PM IST

विनापरवाना आणि अनधिकृत होर्डिंगच्या बजबजपुरीमुळे मुंबई शहर बीभत्स दिसू लागले आहेत. या होर्डिंगविरोधात तक्रार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.

मुंबईतील बेकायदा होर्डिंगविरोधात करा तक्रार
मुंबईतील बेकायदा होर्डिंगविरोधात करा तक्रार

विनापरवाना आणि अनधिकृत होर्डिंगच्या बजबजपुरीमुळे महाराष्ट्रातली अनेक शहरे बीभत्स दिसू लागली आहेत. मुंबई शहरात सुद्धा बेकायदा होर्डिंगचा सुळसुळात झाला आहे. या होर्डिंग, बॅनरविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी हेल्पलाइन जारी केली आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मुंबईकर नागरिकांनी संपर्क करून तक्रार नोंदवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबईक नागरिकांनी १९१६ या टोल-फ्री क्रमांकावर बेकायदा होर्डिंगची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टोल-फ्री क्रमांकाशिवाय विनापरवाना प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांविरोधात वेबसाइट आणि सोशल मीडियावर सुद्धा नागरिक तक्रार नोंदवू शकतात. मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.mcgm.gov.in आणि समाजमाध्‍यमांवरील @mybmc या फेसबूक आणि ट्विटर पेजवर जाऊन सर्वसामान्य नागरिक तक्रार नोंदवू शकतात. 

मुंबईत होर्डिंग लावण्याची परवानगी कुठे?

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिकेच्या हद्दीत जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी १,०१७ जाहिरात फलक, २,३११ बस स्टॉप आणि ३२,५३१ किऑक्स प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राजकीय तसेच बिगरराजकीय जाहिरात फलक महानगरपालिकेने परवागी दिलेल्‍या अधिकृत जागेवरच प्रदर्शित करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर्स, फलक,पोस्‍टर्स लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्‍यात येत असल्‍याचे देखील महानगरपालिकेकडून स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणतेही फलक, बॅनर, पोस्टर प्रदर्शित करण्यास मनाई आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विषयाचे होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास बंदी आहे. अशाप्रकारच्या विना परवानगी जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतुदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’मधील कलम ३२८/३२८-अ, ४७१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदींचा भंग करताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईंचा समावेश आहे.

'न्‍यायालयाच्‍या आदेशाच्‍या अनुषंगाने राजकीय पक्ष, सामाजिक संस्‍था, व्‍यावसायिक पक्षकार आदींचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांना महानगरपालिका प्रशासनाने लेखी पत्र पाठविले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्‍ते, पदपथांवर विनापरवाना जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्‍टर्स प्रदर्शित करू नये, अशी विनंती या पत्राद्वारे करण्‍यात आली असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी सांगितले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर