Badlapur Railway Station Toilet incident : रेल्वे स्थानकावर असलेले शौचालय वापरुन पाच रुपये सुटे नसल्याने ते न दिल्याने एका २८ वर्षीय तरुणाला स्वच्छतागृह सांभाळणाऱ्या बाप लेकाने बेदम मारहाण करत त्याच्यावर अॅसिड ओतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
विनायक बाविस्कर असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अॅसिड गेल्याने त्यांचा डोळा निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी जखमीवर उपचार सुरू असून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर असलेल्या विंनायक बावीस्कर हा टॉयलेट करण्यासाठी गेला होता. टॉयलेटवरुन आल्यावर आरोपींनी त्याच्या कडे टॉयलेट वापरल्याचे पाच रुपये मागितले. यावेळी विनायकने त्याच्या कडे पाच रुपये सुट्टे नसल्याचे कारण सांगत ते देण्यास नकार दिला. याचा टॉयलेट सांभाळणाऱ्या बाप लेकाला राग आला. दोघांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर विनायकच्या चेहऱ्यावर दोघांनी टॉयलेट साफ करण्याचे अॅसिड ओतले. यामुळे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून त्याचा डोळा जखमी झाला. यामुळे युवकचा डोळा निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश कुमार चंद्र पाल सिंह हा स्टेशनवर शौचालय चालविण्याचा ठेकेदार आहे. बदलापूर पश्चिमेकडील गोकुळधाम कॉम्प्लेक्समधील रिक्षाचालक विनायक बाविस्कर हे स्टेशनवर थांबून शौचालयाचा वापर करण्यासाठी गेला होता. टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर आरोपीने पाच रुपयांची मागणी केली, जी बाविस्कर देऊ शकला नाही. यावरून भांडण झाले आणि बाप-लेकाने बाविस्कर यांना मारहाण करून त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याने त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेल्वे पोलिसांनी योगेश कुमारला अटक केली, तर त्याच्या १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात बीएनएस २०२३ कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. योगेश कुमारला आज मंगळवारी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कानडे यांनी दिली.