Pankaja Munde : हल्लीचे राजकीय प्रयोग कोविडसारखे; पंकजा मुंडे नेमकं काय बोलल्या?
Pankaja Munde on Politics : पंकजा मुंडे यांनी देशातील राजकारणात सध्या होत असलेल्या प्रयोगांची तुलना कोविडशी केली आहे.
Pankaja Munde on Maharashtra Politics : काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सध्याच्या राजकारणावरही उपरोधिक भाष्य केलं. आजचं राजकारण कोविडसारखं झालंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांचा रोख नेमका कोणाकडं होता यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट थेट सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळं राज्यातील अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. काही मतदारसंघात खुद्द भाजपच्या नेत्यांचीच अडचण झाली आहे. पंकजा मुंडे या देखील त्यात आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पंकजांचा पराभव केला होता. मात्र आता तेच भाजपसोबत आल्यानं तिथं काय होणार याबाबत साशंकता आहे. याच अनुषंगानं त्यांना आज प्रश्न विचारण्यात आला. परळी विधानसभेत पुढच्या निवडणुकीतील चित्र कसं असेल असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला सोबत घेण्याचा निर्णय ज्यांनी घेतला आहे, त्यांना विचारायला हवा. पक्षात एक व्यवस्था आहे, मांडणी आहे. या प्रश्नाचं उत्तर मी देणं अपेक्षित नाही. मी राष्ट्रीय पदाधिकारी आहे आणि मध्य प्रदेशची प्रभारी आहे. त्या ठिकाणचा प्रश्न मला विचारला तर मी उत्तर देईन, असं म्हणत पंकजा यांनी उत्तर देणं टाळलं.
काँग्रेस पक्षातील प्रवेशाची चर्चा फेटाळून लावताना त्यांनी आजच्या राजकारणावरही भाष्य केलं. 'आजच्या राजकारणात वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतायत. आजचं राजकारण कोविडसारखं आहे. जसा कोविड आपण कधीच पाहिला नव्हता, तसंच राजकारणातले आजचे प्रयोग आपण कधीच पाहिले नव्हते, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
‘बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी आता राहिली नाही असं अलीकडं बातम्यांमधून ऐकायला मिळतं. तसं पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपचं होऊ नये म्हणून माझ्यासारखा छोटा-छोटा कार्यकर्ता धडपडतोय,’ असंही त्यांनी सांगितलं.
विभाग