दिल्ली : राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात दाखल असून यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर आता कोर्ट काय निकाल देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रकरणातील सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी आज बुधवारी संपणार आहे. यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठ आता निकालाची तारीख कधी जाहीर करणार या बाबत उत्सुकता लागली आहे.
शिवसेनेत बंड होऊन राज्यात सत्ता बदल झाला. हा सत्ता बदल बेकायदेशीर असून या बाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गेल्या ७ महिन्यांपासून या बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी व मिनदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता बुधवारी युक्तिवाद करणार आहेत. ‘१०-१५ मिनिटांमध्ये मुद्दे मांडू’, असे मेहता यांनी सरन्यायाधीशांना सांगितले.
मेहतांनंतर ठाकरे गटाच्या वतीने प्रामुख्याने ज्येष्ठ वकील कपिल सिबल व अभिषेक मनू सिंघवी स्पष्टीकरणाचे मुद्दे मांडतील. ‘या प्रकरणाची सुनावणी बुधवारी संपवू,’ असे सरन्यायाधीशांनी सिबलांना सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्ण मुरारी, न्या. एम. आर. शहा आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे.
कपिल सिब्बल यांनी हे बंड बेकायदेशीर असल्यास फुटून गेलेले आमदार यांच्यावर पक्षांतर बंदी प्रमाणे करण्यात आलेली कारवाई बरोबर असून ही बंड घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर हरिष साळवे म्हणाले, उद्धव ठाकरेंना राजीनामा दिला तिथेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विषय संपला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. सध्या हे प्रकरण पुस्तकी आहे. त्यामुळे जे आमदार १६ अपात्र झाले तोच मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आहे. यात राज्यपालांची भूमिका योग्य होती. असे देखील ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही युक्तवाद पूर्ण झाले असून आजच्या सुनावणीत न्यायालय काय बाजू मांडेल ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.