Mahad Chavdal Tale Program : सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे दलित नागरिकांना विहिरीवर पाणी पिण्याचा अधिकार मिळावा तसेच अस्पृश्यतेचे जोखड तोडून टाकण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मोठा लढा उभारला होता. येथील चवदार तळे येथे २० मार्च १९२७ ला बाबासाहेबांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाचा वर्धापन दिन सोहळा आज महाड येथे साजरा होत असून या साठी हजारोच्या संख्येने भीम अनुयाई महाड येथे येणार आहे. या दृष्टीने प्रशासनातर्फे कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महाड येथे आज चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयाई येणार आहेत. येथे येणाऱ्या भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाड नगरपालिका व प्रशासनाकडूनही मोठी तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी या ठिकाणी राज्य व देशभरातून भीमसैनिक येत असतात. मंगळवारपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीक येण्यास सुरुवात झाली आहे. भीमसैनिकांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाने आढावा बैठक घेतली होती. तसेच नियोजन देखील करण्यात आले होते. त्यानुसार आज महाड नगरपालिका, महसूल व पोलिस यंत्रणेकडून जय्यत तयारी महाड येथे करण्यात आली आहे.
नगर परिषदेने मुंबईहून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था गांधारी नाका येथे केली आहे. तर जड वाहनांना गावात येण्यास बंदी करण्यात आली आहे. रायगड नातेकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था दस्तुरी नाका, नातेखिंड परिसर, एसटी थांबा परिसरात केली आहे. तर दापोली, रत्नागिरीहून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था चांदे क्रीडांगण, आयटीआय मैदानात करण्यात आली आहे. पोलादपूर, पुण्याहून येणाऱ्या वाहनांसाठी नवेनगर मैदान, म्हाडाचे मैदान तर अतिरिक्त पार्किंग म्हणून नगरपालिका शाळा क्रमांक पाचचे मैदान व गाडीतळ या ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेने माणगाव व वीर येथे उतरणाऱ्या प्रवाशांकरिता रेल्वे स्थानक ते महाड बसस्थानक अशी बससेवा ठेवण्यात आली आहे.
येथे येणाऱ्या नागरिकांसाठी विविधी सोई सुविधा देण्यात आल्या आहेत. महाड नगरपालिकेकडून चवदार तळे येथे आरओ फिल्टरचे पाणी देण्यात येणार आहे. क्रांतिस्तंभ परिसरात नळजोड देण्यात आले आहे. तर पाण्याच्या साठवण टाक्या आणि टँकर व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहे देखील उभारण्यात आले आहेत. भीमसैनिकांना उन्हाचा त्रास जाणवू नये, या करता मंडप देखील उभारण्यात आला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर रेड कारपेट टाकण्यात आले आहे.