
अपघाताच्या घटना थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतलाय. महामंडळाच्या निर्णयानुसार आता धावत्या बसमध्ये चालकांना मोबाईलवर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात एसटी बसेसच्या अपघाताच्या घटना वाढल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एस महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात असून त्याअंतर्गत आता चालकांना बस चालु असताना मोबाईलवर बोलण्यास बंदी करण्यात आली आहे.
चालकांकडून वाहन चालवताना मोबाईलचा वापर होत असल्यानं त्यांचे बसवरील एकाग्रता कमी होते व बसवरील ताबा सुटून अपघात होत असतात, असे अनेक घटनांमध्ये समोर आले आहे. यावर आता महामंडळाने कडक पाऊले उचलली आहेत. एसटी बस चालवत असताना मोबाईल बोलणे अथवा हेडफोन घालून गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
बस चालवत असताना चालक मोबाईलचा वापर करत असतात. याविषयी सोशल मीडियातून लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून कडक पावले उचलत आहे.
स्वातंत्र्यापासून म्हणजे गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशी एसटी बसची निवड करतात. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवत असताना मोबाईलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, मोबाईलवर व्हिडिओ पाहणं अत्यंत धोकादायक असल्यानं बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुरक्षितता वाटत आहे.
संबंधित बातम्या
