चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरच्या जंगलात बांबू काढण्याचे काम करणाऱ्या मजुरावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला आहे. वाघ मजुराला ठार मारून थांबला नाही तर त्याने मृतदेहावर ५ ते ६ तास ठाण मांडून बसला. वाघाच्या ताब्यातून मृतदेह काढून घेण्याचा थरार बराच वेळ चालला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत त्याला बेशुद्ध केले. मात्र भक्ष्याजवळ बसलेला वाघ तब्बल ६ तास हलला नाही. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
लालसिंह बारेलाल मडावी (५७) असे मृत बांबू कामकाराचे नाव आहे. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यातील बिछाया तहसील अंतर्गत माणिकपूर माळ (बेहराटोला) गावचा रहिवासी आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघाने लालसिंह यांच्यावर हल्ला केला होता. सायंकाळी चार वाजता वाघाला पिंजऱ्यात बंद करण्यात आले.
वनविभागाने सांगितले की, बल्लारपूर वनपरिक्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू आहे. याचा ठेका नगिन पुगलिया या व्यक्तीला दिले असून वनखंड क्रमांक४९३येथे मंगळवारी सकाळी मजूर बांबू कटाईचं काम करत होते. यामध्ये लालसिंह मडावी देखील होते. बांबू कटाई करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने लालसिंह यांच्या झ़डप घातली. कोणाला काही समजण्याच्या आतच मान पकडलेल्या वाघाने त्यांना ठार केले. उपस्थित मजुरांनी आरडाओरडा केला. मात्र,तोवर वाघ मजुराला जंगलात घेऊन गेला होता. याची माहिती मजुराकडून वनविभागाला देण्यात आली.
वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोर वाघ लालसिंह यांच्या मृतदेहाजवळच बसून होता. त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता वाघ चवताळून वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा पयत्न करत होता. काही केल्या वाघ जागचा हलत नसल्याने त्याच्या तावडीतून मृतदेह काढून घेणे मुश्किल बनले. जवळपास ५ ते ६ तास वाघाने मृतदेहाजवळ ठाण मांडले होते. शेवटी बल्लारपूरच्या अतिशीघ्र दलाला पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार यांच्या नेतृत्त्वात शूटर अविनाश फुलझले यांनी वाघाला ट्रँक्विलाइज केले. नंतर तपासणी करून चंद्रपूर वन्यजीव उपचार केंद्रात वाघाला पाठविण्यात आले.
हल्लेखोरवाघ हा नर प्रजातीचा असून त्याचे वय सुमारे ४ वर्षे आहे. वाघाला बेशुद्ध केल्यानंतर लालसिंह यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यासमोर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आला. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात घोषित करण्यात आली.
संबंधित बातम्या