Ahmednagar Crime News Marathi : शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून अहमदनगर जिल्ह्यात तीन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणांचे कपडे काढून झाडाला बांधलं, त्यानंतर त्यांना मारहाण केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात ही घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील दलित संघटनांनी हरेगाव बंद पाळत घटनेचा निषेध केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात मोलमजुरी करून काम करणाऱ्या तीन तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. शेळी आणि कबुतरं चोरल्याच्या संशयावरून गलांडे वस्तीवरील काही लोकांनी तरुणांना मारहाण केली आहे. युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे, मनोज बोडखे आणि दुर्गेश वैद्य अशी पीडित तरुणांची नावं आहे. आरोपींनी या तरुणांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे टांगले. त्यानंतर चोरीविषयी विचारणा करण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणांना कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
हरेगावात दलित तरुणांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समजताच जिल्ह्यातील रिपब्लिकन संघटनांनी तातडीने श्रीरामपुरात धाव घेतली. त्यानंतर एक दिवस हरेगावात बंद पाळण्यात आला. पोलिसांनी आरोपी तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक होण्याची शक्यता आहे. दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. नागरिकांनी संयम ठेवण्याचं आवाहन नगर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.