मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Car Accident : समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कारला भीषण अपघात, तीन प्रवासी जखमी

Car Accident : समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कारला भीषण अपघात, तीन प्रवासी जखमी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 18, 2023 10:45 PM IST

Car Accident On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवलं आहे.

Car Accident On Samruddhi Mahamarg
Car Accident On Samruddhi Mahamarg (HT)

Car Accident On Samruddhi Mahamarg : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघाताची घटना ताजी असतानाच आता बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कार उलटली असून त्यात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहे. बुलढाण्यातील इंटरचेंज परिसरात आज संध्याकाळी पुन्हा अपघात झाल्यामुळं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरहून शिर्डीच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारचं सिंदखेड राजा इंटरचेंज जवळ अचानक टायर फुटलं. त्यामुळं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन दुभाजकावर आदळली. या अपघातात जय भंडारी, मुकेश पकतान आणि प्रदीप सानप हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात अवजड वाहनांचा अपघात झाल्यामुळं एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता बुलढाण्याजवळ कार अपघातात आणखी तीन जण जखमी झाले आहे. समृद्धी महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्यामुळं चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

IPL_Entry_Point