Maharashtra vidhan sabha election results : राज्यात पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघांत रंगदार लढती झाल्या. या २१ मतदारसंघांपैकी १८ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. तर काही नव्या चेहऱ्यांनी विजय मिळवला. यात मिनी मंत्रालय असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांची आमदारपदी वर्णी लागली आहे. यात भोरमधून राष्ट्रवादी पक्षाचे शंकर मांडेकर व शिरुर हवेलीतून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, तर खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी विजय मिळवला आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड समला जातो. पुणे जिल्हा परिषदेवर देखील राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहेत. अजित पवार यांनी अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाची संधी दिली आहे. याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकांनी या पूर्वी आमदारकी पर्यंत मजल मारली आहे. यात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे यांची नावे प्रामुख्याने घेतली जाते.
सध्या निवडणूक आलेले तिन्ही आमदार हे २०१७ ते २२ या कालावधीत जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. अजित पवार यांनी माऊली कटके यांना शिरूर हवेली मतदार संघातून तर शंकर मांडेकर यांना भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खेड आळंदी मतदार संघातून बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली होती. या तिन्ही उमेदवारांनी जिल्हा परिषदेचे सदस्य असतांना मोठी कामे केली आहेत. त्या बळावर त्यांनी विधानसभा निवडणुकीत देखील आपले नशीब आजमावले. हे तिन्ही सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.
माऊली कटके यांनी गेल्या दोन वेळा शिरूर हवेलीतून निवडून आलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा पराभव केला. तर शंभर मांडेकर यांनी कॉँग्रेसचे गेल्या तीन टर्म आमदार राहिलेले व मंत्री पदाच्या शर्यतीत असलेले संग्राम थोपटे यांचा पराभव केला आहे. तर बाबाजी काळे यांनी खेड आळंदी मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर कटके यांनी आमदार अशोक पवार यांचा तब्बल ७४ हजार ५५० इतक्या मताधिक्यांनी पराभव केला. तर बाबाजी काळे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा ५१ हजार हजार ७४३ इतक्या मताधिक्याने पराभव केला. तर शंकर मांडेकर यांनी भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचा तब्बल १९ हजार ६३८ इतक्या मतांनी पराभव केला.