Navi Mumbai Accident News: नवी मुंबईत आज (२५ ऑक्टोबर २०२४) पहाटे कार आणि डंपर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जात असताना वाशी खाडी पुलावर पहाटे सव्वाचारच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात कसा झाला? हे अद्याप पोलिसांना कळू शकलेले नाही. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका अधिकऱ्याने सांगितले की, काही लोक पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी खाडी पुलाजवळ त्यांच्या कारची डंपरला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
समृद्धी महामार्गावर आज पहाटे चार वाजताच्या सुमारास वाशिमच्या कारंजा टोल प्लाझाजवळ दोन ट्रकमध्ये अपघात घडला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये केमिकलच्या कॅन होत्या. त्यामुळे लगेच आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. सुदैवाने, या अपघात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.परंतु, या आगीमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
सायन-पनवेल महामार्गावर भरधाव कारची टेम्पोला धडक दिल्याची घटना सोमवारी (२१ ऑक्टोबर २०२४) घडली. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर पार्किंग लाइट न लावता निष्काळजीपणे टेम्पो पार्क केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र राजेंद्र राय (वय, ४५) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, गौरव विजयशंकर सिन्हा (वय, ४५) आणि अभिनव रामकुमार सिन्हा (वय, ४०) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही कस्टम अधिकारी असून रात्रीच्या शिफ्टवरून घरी जात होते. परंतु, नवी मुंबईतील जुईनगर स्कायवॉकजवळ त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
संबंधित बातम्या