रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना चुकून झालेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ठाण्यातील वागळे इस्टेट येथे घडली. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कंपनी मालक मोहम्मद उमर शेख (५०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) यांच्यासह बिपीन कुमार जयस्वाल (२१ रा. रुपादेवी पाडा, ठाणे) आणि राहूल कुमार जयस्वाल (२३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) हे तिघेजण जखमी झाले आहेत.
ठाण्यातील वागळे इस्टेट, रामनगर भागातील रोड क्रमांक २८ येथील चामुंडा फॅब्रिकेटर्स अ ४१६ या गाळयातील कंपनीमध्ये सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीचे मालक शेख हे त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरची स्वच्छता करत होता. त्यावेळी त्यांच्याकडून चुकून एक राऊंड राऊंड फायर झाला. यामध्ये त्यांच्या स्वत:च्या डाव्या हाताच्या बोटांना तसेच तिचे उपस्थित असलेले बिपिन कुमार या कामगाराच्या उजव्या हाताला आणि राहुल कुमार या अन्य कामगाराच्या हातालाही गोळी लागल्याने ते जखमी झाले. गोळीबाराच्या घटनेनंतर तिघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्यासह श्रीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद याच्याकडे बंदूकीचा परवाना आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.